घर पाहावे बांधून, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. अर्थात घर बांधणे ही किती कठीण गोष्ट आहे, आणि ते येरागबाळ्याचे काम कसे नाही, असा त्याचा अर्थ मराठी समाजमनात पक्का ठसलेला आहे.
कालौघात, आता घराची जागा सदनिकांनी घेतली आहे आणि बांधण्याची जबाबदारी व्यावसायिक बिल्डर्सनी. पण तरीही ते अजूनही तितकेच अवघड काम आहे.
बहुतांश लोक अजूनही आयुष्यात एकदाच सदनिका घेत असल्यामुळे, घेणाऱ्यांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या असतात. ‘घर पाहावे बांधून’ ह्या म्हणीची जागा आता त्यामुळेच, ‘(चांगला) बिल्डर पाहावा शोधून’, ह्या म्हणीने घेतली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
अश्या ह्या परिस्थितीत माझी स्थिती आणखीच मजेदार होती. आमच्या वडिलोपार्जित घरात आता अनेक हिस्सेदार होते. आम्हासगळ्यांना अर्थातच जमिनीचा जास्तीतजास्त मोबदला देईल, असा बिल्डर हवा होता. पण त्याच वेळी आम्हाला स्वतःलाही राहण्यास सदनिकाही हव्या असल्याने, त्या रास्त दारात, उत्तम बांधलेल्या, आणि लवकरातलवकर, हव्या होत्या.

थोडक्यात विक्रेता आणि ग्राहक अश्या दोन्हीं भूमिकांत असल्यामुळे आमच्याच मनात अंतर्विरोध होता, आणि त्याचे निरसन करू शकेल अशा बिल्डरची आम्हाला आवश्यकता होती. त्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी परिस्थिती.
अर्थातच त्यामुळे अनेक बिल्डर्सना भेटून झाले. आता बिल्डर म्हटले तर आपल्या मनात एक वेगळीच प्रतिमा निर्माण होते, बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याची जाड जाड चेन, मोठमोठ्या गाड्यांमधून गॉगल्स लावून उतरणाऱ्या व्यक्ती म्हणजेच बिल्डर्स!
परंतु ह्या प्रतिमेच्या अगदी विपरीत एकजण आम्हाला भेटले. माझी त्यांची पहिली भेट त्यांच्या घरी, कौटुंबिक वातावरणात झाली. स्वतःच्या घरात भेटलेले ते एकमेव बिल्डर, रघुकुल कन्स्ट्रक्शनचे दिलीप भराडे.
त्यांचा ऋजु, साधासरळ, शांतस्वभाव आम्हां सगळ्यांनाच भावला. ह्यागोष्टीला आता पंधरावीस वर्षे झाली.
आमच्या सदनिका बांधल्या जाऊनही आता बारा वर्षे होऊन गेली आहेत. ह्या व्यवहारादरम्यान त्यांच्या आणखीन काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांची पारदर्शिता, व्यावसायिकता, आणि मुख्य म्हणजे त्यांची accessibility. बांधकाम आणि सगळे व्यवहार त्यामुळेच निर्विवाद, सौहार्दपूर्ण वातावरणात, ठरल्याप्रमाणे झाले, दिलेल्या वचनाप्रमाणे! अगदी, रघुकुल रीत. . ची आठवण व्हावी असे.
इतक्यावर्षांत ‘भराडे साहेबां’वरून ते ‘दिलीपदादा’ कधी झाले हे कळलंच नाही. बिल्डर शोधता शोधता मला मोठे भाऊच मिळाले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

त्यांना शिक्षणाचं फार महत्त्व आहे. ते स्वतः AMIE झाले. त्यांच्या पत्नी आणि मुलंही उच्चविद्याविभूषित आहेत. मुख्यम्हणजे असं शिक्षण सर्वांना कसं मिळू शकेल ह्याविषयी त्यांना तळमळ आहे. त्यातूनच जामदार शाळेचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी इमारतीच्या जिर्णोद्धारासोबतच, शैक्षणिक शिबिरे, वर्कशॉप इत्यादी अनेक गोष्टी ते करवून घेत आहेत.

सामाजिक कार्यातही त्यांना रुची आहे. उमरेड रोडवरील मातृसेवा संघाच्या पंचवटी वृद्धाश्रमासाठी त्यांनी काही खोल्या बांधून दिलेल्या आहेत.
ते एक उत्तम गायकसुद्धा आहेत. गाण्याच्या माध्यमातूनही त्यांच्याशी ऋणानुबंध जुळत गेले. आता तर अगदी बारीकसारीक वैयक्तिक गोष्टींवरही त्यांच्याशी चर्चा होतात. माझ्या कठीण परिस्थितीतही त्यांनी मला भरपूर साथ दिलेली आहे. नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत.

दिलीपदादा, तुमचा असाच स्नेह आमच्यावर सदा राहो, आणि तुम्हाला सुख समृद्धी, निरामय कृतिशील जीवन आणि जिव्हाळ्याच्या माणसांचा आनंददायी अखंड सहवास लाभो हीच मनोकामना.

 

सौ.स्वाती मोहोनी  / भरत मोहोनी